November 17, 2012

बाळ केशव ठाकरे यांचे मार्मिक- BalaSaheb Thakare's Short History

BalaSaheb Thakare's Short History

मार्मिक

'मार्मिक' म्हटलं की आठवतात ती राजकीय व्यंगचित्रं..1960 ते 1985 पर्यंत पंधरा वर्षं मराठी मनावर गारुड केलं होतं ते मार्मिक मधल्या व्यंगचित्रांनी आणि ती म ार्मिकपणं समाजमनाला भिडवणा-या बाळ केशव ठाकरे या व्यंगचित्रकारानं.

आवाज मराठी माणसाचा

1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. स्वतंत्र महाराष्ट्राचा राज्यकारभारही सुरु झाला. पण मुंबईतल्या मराठी माणसाची पोरकेपणाची भावना काही जाईना. कारण तोपर्यंत मुंबई ताब्यात गेली होती अमराठी माणसांच्या. उद्योगधंदेच नव्हेत तर राज्यातल्या सरकारी नोक-या याच मंडळींनी बळकावल्या होत्या. त्यामुळं बेरोजगार मराठी माणसांची मनं संतापानं धुमसत होती. 13 ऑगस्ट 1960 या दिवशी या निराधार मराठी मनांना एक भक्कम आधार मिळाला. अस्वस्थ मराठी माणसांची भावना व्यक्त करणा-या, मराठी माणसांचे हक्क सांगणा-या आणि त्यांचा स्वाभिमान जागृत करणा-या व्यंगचित्र साप्ताहिकाचा 'मार्मिक'चा. मुंबईत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी 'मार्मिक'च्या पहिल्या अंकाचं प्रकाशन केलं. व्यापीठावर होते, किरकोळ अंगकाठीचे 'मार्मिक'चे संपादक बाळ केशव ठाकरे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले एक वयोवृद्ध शिलेदार आणि मुलाच्या हाती कुंचल्याची तलवार देणारे प्रबोधनकार ठाकरे. 'मार्मिक'चा जन्मच सहका-यांच्या मदतीतून झाला. पेपरवितरक बुवा दांगटांनी बाळासाहेबांना 5 हजार रुपये दिल्यानं पहिला अंक निघू शकला. व्यंगचित्रांची लयलूट आणि विचारांचं सोनं उधळणा-या 'मार्मिक'नं लवकरच मराठी मनाचा कब्जा घेतला. खुसखुशीत, कुरकुरीत व्यंगचित्रं आणि खमंग मजकूर यामुळं 'मार्मिक' लोकप्रिय झाला. बाळासाहेब, द. पा. खांबेटे आणि श्रीकांतजी ठाकरे ही 'मार्मिक'ची लोकप्रिय त्रिमूर्ती.
बाळ ठाकरेंचं राजकीय भाष्य करणारं कव्हरवरचं व्यंगचित्र, रविवारची जत्रा, श्रीकांत ठाकरेंची दोन व्यंगचित्रं, सिनेप्रिक्षान आणि शुद्ध निषाद ही सदरं, सहाय्यक संपादक द. पा. तथा अण्णा खांबेटे यांचे विनोदी लेख यांना, वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला. विनोदी लेखांपासून ते हेरकथांपर्यंतचे विविध प्रकारचे लेख, प्रबोधनकारांचे धनुष्याच्या टणत्कारासारखे लेख, नरेंद्र बल्लाळ, वि. ना. कापडी, अनिल नाडकर्णींच्या हसवणा-या कथा, पिटातल्या शिट्‌ट्या, असा भरगच्च मजकूर वाचण्याचं व्यसनच वाचकांना लागलं. पण त्यातही 'मार्मिक' वाचनाची एक 'खास सवय' वाचकांना लागली. पंढरीनाथ सावंत सांगतात, ‘वाचक पहिल्यांदा कव्हरवरचं व्यंगचित्र न्याहाळीत. मग सेंटरस्परेड म्हणजेच मधलं पान उघडायचं. तिथं बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांची रविवारची जत्रा भरलेली असे. मग शेवटच्या पानावरचं श्रीकांत ठाकरेंचं 'सिनेप्रिक्षान' हे सिनेमावरचं परीक्षण वाचायचं. त्यानंतर मग अग्रलेख आणि इतर अंकाच्या वाचनाला सुरुवात व्हायची...’

गुदगुल्या आणि हजामती.

बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांनी राजकारण्यांना केलेल्या गुदगुल्या, मारलेल्या टपल्या, केलेली हजामत पाहून वाचकांची करमणूक व्हायची. या रविवारी आता आपलं कोणतं रुप येणार याचा राजकारणी धसका घ्यायचे. केवळ करमणूकच नाही तर 'मार्मिक'ची रविवारची जत्रा मराठी वाचकांची प्रेरणा बनली. त्यांना लढायचं बळ देणारी संजीवन शक्ती बनली. ब्राम्हण ब्राम्हणेतर चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंत सगळे विषय 'मार्मिक'नं हाताळले. '’मार्मिक’वर प्रभाव होता तो सत्यशोधक चळवळीचा. त्यामुळं सुरुवातीला बुवाबाजीवर खूप व्यंगचित्रं असत’, असं सावंत सांगतात. असल्यानं...

शिवसेना!

मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांच्या बाजूनं निर्भिडपणं लिहायचं ही मार्मिकची भूमिका. त्यामुळं 'मार्मिक'मधले ज्वलंत विचार वाचून अस्वस्थ झालेला मराठी माणूस 'मार्मिक'च्या कचेरीची म्हणजेच ठाकरे परिवाराच्या शिवाजी पार्कवरच्या घराची वाट धरायचा. माणसांचे लोंढेच्या लोंढे इथं येऊन धडकायचे. बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे सगळं पाहात होते. यातूनच शिवसेनेचा जन्म कसा झाला याविषयी सावंत सांगतात, ‘एक दिवस बाळासाहेबांना ते म्हणाले, 'बाळ, या गर्दीला, धुमसणा-या मराठी शक्तीला कधी आकार देणार आहेस की नाही? उत्तरादाखल बाळासाहेबांनी नारळ आणवला. तो छत्रपतींच्या पुतळ्यासमोर फोडायला लावला. आणि एका लढवय्या संघटनेची स्थापना झाली. प्रबोधनकारांनी तिचं बारसं केलं. नाव ठेवलं, शिवसेना! तारीख होती 19 जून 1966.

'वाचा आणि थंड बसा'

सुरुवातीला मुंबईतल्या अमराठी लोकांची आकडेवारी देऊन 'वाचा आणि थंड बसा' असं आवाहन 'मार्मिक' करायचं. शिवसेनेची स्थापना झाल्यावर या आवाहनाचं रुपांतर 'वाचा आणि पेटून उठा' असं झालं. 'रविवारच्या जत्रे'खाली दहा-बारा शब्दांच्या ओळीचं मेळाव्याचं किंवा सभेचं आवाहन असायचं. तेवढ्यावर लाखो शिवसैनिक ढोलताशे वाजवत, गुलाल उधळत शिवाजी पार्कवर येत. शिवसेनेचं हे मुखपत्र लोकांचं मुखपत्र झालं. शिवसेनेच्या सभांना किती गर्दी होई, याबाबत सावंत सांगतात, ‘मी पाहिलंय, शिवाजी पार्कच्या भिंतींना माणसं टेकत...’ मार्मिकनं चेतवलेली मराठी माणसं अन्यायाविरुद्ध भक्कमपणं उभी राहिली. सामान्य माणसांची अडवणूक करणा-यांना शिवसैनिकांनी धडा शिकवला. महागाईविरुद्ध लढणा-या शिवसेनेच्या महिला रेशन दुकानांमध्ये जात आणि दुकानदाराला बाहेर काढून लोकांना धान्य वाटून टाकत.

मराठी माणसाची ढाल-तलवार

'मार्मिक'मधून बाळासाहेबांनी मराठी तरुण चेतवला. त्याच्या मनातला न्यूनगंड काढून टाकला. मराठी माणसांच्या हक्कासाठी मार्मिक ढाल, तलवार बनला. यातूनच मराठी माणूस पुन्हा ताठ मानेनं उभा राहिला. समाजप्रबोधनाचा वसा मार्मिकनं अजूनही जपलाय. अजूनही 'मार्मिक' तेवढ्यात आवडीनं वाचला जातोय. वाचक मार्मिकवर भरभरून प्रेम करतायत. अनेक वाचकांनी 'मार्मिक'चे अंक जपून ठेवलेत. मराठी माणसाचा स्वाभिमान जागवणारा तो काळ आणि बाळासाहेबांची व्यंगचित्रं त्यांना आजही नवी उभारी देतायत. मुंबईतले एक जुने वाचक वसंत तावडे सांगतात, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात नवयुगमधली बाळासाहेबांची व्यंगचित्र आम्ही मोठी करून चौकात लावायचो. 1960 पासूनचे 'मार्मिक'चे अंक मी जपून ठेवलेत.

पायाचा दगड

मार्मिकचे माजी कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे दिवंगत नेते प्रमोद नवलकर म्हणतात, '' मराठी भूमीचे थर काढलेत तर तुम्हाला त्याखाली मराठी माणसाचा त्याग सापडेल. त्याच्या श्रमाचा घाम ओघळत असेल. रक्ताचे थर साचलेले असतील. तरीही खणत राहिलात तर शिवसेनेचा भगवा हाती लागेल. त्या भगव्याच्या काठीखाली 'सामना'चे वेटोळे असेल. पण शेवटी पायाचा दगड हाती लागला तर त्यावर तीनच अक्षरे कोरलेली असतील... मार्मिक!'' 'मार्मिक'च्या या ऐतिहासिक कार्याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झालीय.

लोकनेता चित्रकार

एका सामान्य चित्रकाराची चित्रं सर्वसामान्य माणसातला स्वाभिमान जागृत करतात. त्यांना लढाईचं बळ देतात. आणि त्यातून एक प्रचंड लोकशक्ती उभी राहते. आणि हा चित्रकार लोकांच्या गळ्यातला ताईत बनतो. हा इतिहास घडलाय महाराष्ट्रात. आणि तो घडवणा-या व्यंगचित्रकाराचं नाव आहे, बाळ केशव ठाकरे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सरळ रेषेत चालणारा मराठी माणूस एका माणसाच्या तिरप्या रेषेवर बेहद्द खूष आहेत. हा माणूस आहे, व्यंगचित्रकार. आपल्या चित्रांमधून त्यानं मराठी माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडलीय. आणि त्यांच्या हृदयात कायमचं स्थान मिळवलंय. त्यांच्या मेंदूत पेटून उठण्याची ठिणगी टाकलीय. त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे! महाराष्ट्रातल्या राजकारणातले किंगमेकर अशी ओळख असणारा हा माणूस मूळचा आहे, एक जातीवंत व्यंगचित्रकार. मराठीचा झेंडा जगभर उंचावणा-या या व्यंगचित्रकाराला घरातूनच समाजसुधारणेचं बाळकडू मिळालं. वडील प्रबोधनकार केशव ठाकरेंनी समाजप्रबोधनाचा वसा घेतलेला आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा गाजवलेला. त्यामुळंच त्यांचा वारसा चालवणा-या बाळासाहेबांची चित्रं सामान्य माणसाची व्यथा मांडू शकली. लोकप्रिय होऊ शकली. ‘मार्मिक’साठी अनेक वर्षे चित्रं काढणारे व्यंगचित्रकार विकास सबनीस सांगतात, समाज सेवेचं बाळकडू बाळासाहेबांना घरातूनच मिळालं होतं. एका अव्वल व्यंगचित्रकाराला आवश्यक असते ती सूक्ष्म आणि तरतरीत विनोदबुद्धी, भरपूर बेरकीपणा, अभ्यास आणि डोक्यात उसळ्या मारणारं एक रसायन. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात या गोष्टींचा अपूर्व असा संगम झालाय.

डेव्हिड लो यांचा प्रभाव

व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी सांगतात, ‘बाळासाहेबांना तेराव्या चौदाव्या वर्षीच चित्रकलेची दीक्षा दिली ती त्यांच्या वडिलांनी. प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरेंनी. चित्रकार बॅनबेरींच्या व्यंगचित्रांमुळं ते चित्रकलेकडं वळले. बॅनबेरी दुस-या महायुद्धाच्या काळात टाइम्स ऑफ इंडियात व्यंगचित्र काढत असत. 1945 पासून बाळासाहेबांनी व्यंगचित्रं काढायला सुरुवात केली. आणि 1947पासून 'फ्री प्रेस'मध्ये नोकरी. त्यांच्यावर प्रभाव पडला तो जगप्रसिद्ध चित्रकार डेव्हिड लो यांचा’. चित्रकार दिनानाथ दलालांच्या चित्रकलेचाही बाळासाहेबांवर प्रभाव होता. नवशक्ती, मराठा, नवयुग, धनुर्धारीमध्ये ते चित्रं काढत. फ्री प्रेसमध्ये नोकरी करताना त्यांनी अत्र्यांच्या 'मराठा'मध्ये 'मावळा' नावानं चित्रं काढली. शंकर्स विकली हे दिल्लीहून निघणारं राजकीय व्यंगचित्रांचं साप्ताहिक. तसा प्रयोग मुंबईत करण्याचा ध्यास बाळासाहेबांनी घेतला. आणि फ्री प्रेसमधून बाहेर पडून व्यंगचित्र साप्ताहिक काढायचं ठरवलं. त्यांच्या या विचाराला प्रबोधनकारांनी केवळ प्रोत्साहनच नाही तर साप्ताहिकाचं नावही सुचवलं. 'मार्मिक'! 13 ऑगस्ट 1960 रोजी सुरू झालेल्या मार्मिकच्या प्रवासानं व्यंगचित्र विश्‍वात इतिहास घडवला. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण राजकीय कॅरेकेचर्सनी धमाल उडवली... बाळासाहेबांमधील धमाल व्यंगचित्रकाराचं उदाहरण देताना प्रशांत कुलकर्णी, इंदिरा गांधींचं एक व्यंगचित्र दाखवतात. ज्यात इंदिरागांधींच्या लांबलचक वाकड्या नाकाला नऊ राज्यांतले राजकारणी लटकलेले दाखवलेत. या राजकारण्यांनी त्यांना त्या काळी जेरीस आणलं होतं. त्याला कॅप्शन होती, नाकात आले नऊ!

शिस्तबद्ध चित्रकार

बाळासाहेबांचा व्यंगचित्रांचा वारसा चालवलाय तो त्यांचे पुतणे राज ठाकरे यांनी. त्यांना बाळासाहेबांच्या प्रत्येक चित्रातले बारकावे माहीत आहेत. बाळासाहेबांच्या चित्रांविषयी ते सांगतात, ‘बाळासाहेबांच्या चित्रात एक फोर्स आहे. त्यांच्या चित्रात जाणवते ती एक शिस्त. सगळं चित्र कसं आखीव-रेखीव गोळीबंद. व्यंगचित्राची गॅगलाईन चमकदार अन् टवटवीत. कुठेही उधळमाधळ नाही. कारणाशिवाय रेषेची लूडबूड नाही. एक अकृत्रिम अशी नजाकत. त्यांची ही शैली अनेक चित्रकारांना आदर्शवत वाटतेय. जागतिक स्तरावरच्या मोजक्या व्यंगचित्रकारांमध्ये बाळासाहेबांची गणना होते.’

कलाकारांवर रिमोट नाही

शिवसेनेसारख्या कडव्या संघटनेवर असलेली बाळासाहेबांची हुकुमत सर्वांना माहित आहे. पण त्यांची खरी हुकुमत आहे ती कुंचल्यावर. आपल्या रिमोट कंट्रोलचा राजकारणात हुकमी वापर करणा-या बाळासाहेबांनी 'मार्मिक'मध्ये व्यंगचित्रं काढणा-या चित्रकारांवर मात्र रिमोट चालवला नाही. कारण हा सच्चा कलाकार कला आणि कलाकाराचं स्वातंत्र्य जाणून आहे. विकास सबनीस सांगतात, ‘बाळासाहेबांनंतर राज ठाकरे आणि मी मार्मिकमध्ये व्यंगचित्रं काढू लागलो. पण आपला रिमोट कंट्रोल त्यांनी कधीही आमच्यावर चालवला नाही. आम्हाला अमूकच कार्टून काढा असा आग्रह कधीही केला नाही’

रविवारची जत्रा

बाळासाहेबांची नजर आजूबाजूच्या भल्याबु-या वास्तवातलं भेदक वास्तव टिपायची. आठवड्याच्या घटना घडामोडींचा ते आढावा घ्यायचे. जे विषय हॅमर करायचे ते ऐरणीवर घ्यायचे. आणि रविवारची जत्रा फुलायची. महाराष्ट्रातला एकही पुढारी या जत्रेतून सुटला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा बाळासाहेबांनी बारकाईनं अभ्यास केला होता. त्यामुळंच ते एक यशस्वी व्यंगचित्रकार बनले. आणि त्याच जोरावर यशस्वी राजकारणीसुद्धा. एक व्यंगचित्रकार राजकीय नेता होण्याचं हे एकमेव उदाहरण असावं. व्यंगचित्रकार शि. द. फडणीस सांगतात, ‘१९८३ला कोल्हापुरात झालेल्या व्यंगचित्रकारांच्या संमेलनाचे बाळासाहेब अध्यक्ष होते. व्यंगचित्रकारानं राजकीय नेतृत्व केल्याचं हे पहिलं उदाहरण. पण बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात व्यंगचित्रकार आणि राजकारणी असे दोन स्वतंत्र कप्पे आहेत.’

नव्या पिढीलाही आकर्षण

बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचं आणि व्यंगचित्रांचं आकर्षण केवळ जुन्याच नाही तर नव्या पिढीलाही आहे. त्यांची व्यंगचित्रं सगळीकडं पोहोचावीत यासाठी आता प्रयत्न सुरू झालेत. मुंबईतले तरुण कलाकार संजय सुरे यांनी नुकतीच बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांची ठिकठिकाणी प्रदर्शनं भरवलीत.

रसिकांचा हृदयसम्राट

व्यंगचित्रकारांनी भरपूर अभ्यास करावा, असा सल्ला बाळासाहेब आवर्जून देतात. कलेत सूडवृत्ती नसावी. कुणाचा सूड घ्यायचा म्हणून मी कधीच चित्रं काढली नाहीत. मला प्रसिद्धीची हौस नाही. आपणहून लाइमलाईटखाली जाऊन उभं राहायला मला आवडत नाही, असं सांगणारे बाळासाहेब केव्हाच लाखो सर्वसामान्य लोक, रसिक, कलावंतांचे हृदयसम्राट बनले. source- facebook

3 comments:

Dark Truth said...

Even now also this magazine is my favorite . RIP Balasaheb.

Sushant Danekar said...

yeah thats true i am looking for some old copies

Fox Thinker said...

हार्दिक अभिनंदन.. आपल्या लेखनाने प्रभावित होऊन आम्ही आपल्या ब्लॉगचा समावेश मराठी वेब विश्व वर केला आहे.
अधिक माहितीसाठी भेट द्या.

www.Facebook.com/MarathiWvishv
www.MWvishv.Tk
www.Twitter.com/MarathiWvishv


धन्यवाद..!!
मराठी वेब विश्व - मराठीतील सर्व संकेतस्थळे एकाच छताखाली..
आम्ही मराठीतील प्रत्येक संकेतस्थळावरील हालचाल समस्त वाचकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो.


टिपंणी प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहोत..!!